नवी दिल्ली, दि. ९ सप्टेंबर : कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट (सीडीएम) च्या वतीने करण्यात आलेल्या अंतर्गत अभ्यासात कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि भगवद्गीता यासारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांना सध्याच्या लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच इंडियन कल्चर स्टडी फोरम अर्थात भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या फोरमची स्थापना करण्याची शिफारसही या अभ्यासाअंती करण्यात आली आहे. कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट सिकंदराबादमध्ये असून, तिथे लष्कर, नौदल आणि हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उच्च दर्जाच्या संरक्षण व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण दिले जाते.
भगवद्गीता हा जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे, तर आर्य चाणक्य अर्थात कौटिल्याचे अर्थशास्त्र जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल मार्गदर्शन करते. या आणि अशा प्राचीन भारतीय ग्रंथांमधील आताच्या काळाला सुसंगत अशा शिकवणीचा सध्याच्या लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमात समावेश करण्याचे मार्ग शोधावेत, यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे.
भारतीय लष्कराचे भारतीयीकरण करण्याच्या उद्देशाने गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारने नव्याने जोर लावला आहे. मार्च महिन्यात गुजरातमध्ये केवडीया येथे झालेल्या कम्बाइन्ड कंमाडर्स कॉन्फेरंसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय भारतीय संरक्षण दलांमध्ये स्वदेशी धोरणाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याची गरज व्यक्त केली होती. लष्करी शस्त्रांसोबतच लष्करात वापरले जाणारे संदर्भग्रंथ, तत्त्वज्ञान, विचार आणि पद्धती यामध्येही स्वदेशी ज्ञानाचा अंतर्भाव करण्याबद्दलचे विचार त्यांनी मांडले होते.