वाचाळवीरांवर कायद्याचा बडगा बसावा, हेच उद्दिष्ट; अब्रू नुकसानीचा कोणताही दावा केलेला नाही : ऍड. धृतिमन जोशी
मुंबई, दि. २८ सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात रा. स्व. संघाचे कार्यकर्ते ऍड. धृतिमन जोशी यांनी कुर्ला न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे अब्रू नुकसानीचा १०० कोटी रूपयांचा दावा करणारी नोटीस धृतिमन जोशी यांनी पाठविली असल्याचे चुकीचे विधान अनेक माध्यमांमार्फत करण्यात आले. आपण असा कोणताही अब्रू नुकसानीचा दावा केला नसून हिंदू समाज किंवा संघाविषयी तथ्य आधारित माहिती न घेता खोडसाळपणे, मानहानीकारक, आक्षेपार्ह बतावणी करणाऱ्या तथाकथित लोकांना फक्त त्यांच्या चुकीची शिक्षा व्हावी, याकरिताच आपण तक्रार दाखल केली असल्याचेही जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानवर ताबा घेतला. त्यानंतर जावेद अख्तर यांनी संघ आणि तालिबान यांची तुलना केली होती. संघाची बदनामी करण्यासाठीच त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचे स्पष्ट दिसते, असे जोशी यांनी म्हटले आहे. जे संघाशी संबंधित आहेत किंवा संघाशी जोडले जाऊ इच्छितात त्यांना यापासून परावृत्त करणे, हाच एक हेतू यामागे दिसतो असेही जोशी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, वारंवार हिंदू समाज आणि संघाची बदनामी करणाऱ्या तसेच मानहानीकारक वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांना कायद्याचा बडगा बसावा, त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी, या एकमात्र उद्देशानेच आपण फौजदारी तक्रार दाखल केली असल्याचे धृतिमन जोशी यांनी म्हटले आहे.
—