हिंदुस्थान की बेटी – गीताची कहाणी
नियती कोणाशी कसा खेळ करेल काही सांगता येत नाही.काही जणांना आयुष्यातील बराच काळ उन्हातच चालत वाटचाल करावी लागते.कधीतरी त्यांच्या आयुष्याला शरदाच्या चांदण्याचा स्पर्श होतो आणि त्यांच्या जीवनाची दिशा बदलते. अशीच कहाणी आहे गीताची! वयाच्या सातव्या -आठव्या वर्षी समझौता एक्स्प्रेसमधुन चुकुन पाकिस्तानात पोहचली. लाहोर रेल्वेस्थानकावर पाकिस्तानी रेंजर्सना ती सापडली. त्यांनी तिला “ऐधी फाऊंडेशन” नावाच्या एका सामाजिक संस्थेकडे सुपूर्द केले.
या संस्थेने तिला दत्तक घेतले आणि तिचा सांभाळ केला.तिथे “उजमा” असे नाव दिलेली ही मुलगी आपल्या धर्मसंस्कृतीची मूळ विसरली नाही. पाकिस्तानात राहूनही शाकाहार आणि नित्यपूजा असा तिचा दिनक्रम होता.गीता ही पूर्णत: मूकबधीर आहे व अशी एक भारतीय मुलगी पाकिस्तानात आहे. ही बाब इंदौर येथील ज्ञानेंद्र पुरोहित आणि त्यांच्या पत्नी मोनिका यांना समजली. पुरोहित दांपत्य हे इंदौर येथे आनंद सर्विस सोसायटीच्या माध्यमातुन मुकबधीरासाठी मोठे कार्य करतात. परभणी येथील पहल फाऊंडेशनचे अनिकेत शेलगावकर यांना त्यांनी बोलावुन घेतले आणि गीताशी व्हिडिओ काॅलद्वारे संपर्क केला. अनिकेत हे गीताशी संपर्क करणारे पहिले भारतीय ठरले.
गीताला मायभुमीची ओढ लागलीच होती.तिने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ज्ञानेंद्र यांनी भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क केला. सुषमाजी म्हणजे असामान्य प्रतिभेच्या धनी. द्रष्ट्या राजकीय नेत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक मातृह्रदयी व्यक्तीमत्व! परराष्ट्रमंत्री असतांना त्यांच्यातील वात्सल्याचा अनुभव अनेक भारतीयांना आलेला आहे. गीता त्याला अपवाद कशी असणार होती?
सुषमा स्वराज यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून गीताला मायभुमीत परत आणले. सुरुवातीला पंजाबी फाऊंडेशन आणि नंतर ज्ञानेंद्र पुरोहित यांच्या आनंद सर्विस सोसायटीमध्ये ती राहत होती. तिच्या दिनक्रमावरुन ज्ञानेंद्र यांच्या लक्षात आले की ही मुलगी इतकी वर्ष पाकिस्तानात राहिली तरी ती आपला धर्म आणि संस्कृती विसरली नाही. ती हिंदुधर्माप्रमाणे आचरण करते,पूर्णत: शाकाहारी आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तानात देखील ती श्रीकृष्णाची भक्ती करत असे. गीताची देवनागरीतील आकडेमोड,तिच्या राहणीमानाची पध्दत,संस्कृती यावरुन ती महाराष्ट्रातील असल्याचे ज्ञानेंद्र यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तिच्या जन्मदात्यांचा शोध घ्यायचे ठरवले.
त्यांनी अनिकेत यांचे वडील डॉ. अशोकराव शेलगावकर यांच्याशी संपर्क केला. गीताच्या स्मृतीप्रमाणे तिच्या घराजवळ नदी वाहत होती आणि मंदिर होते. असे बालपणातील संदर्भ आठवून विविध ठिकाणी तिच्या जन्मदात्यांचा शोध सुरु झाला. गीता मुकबधीर असल्याने त्यात अडथळेही बरेच होते. हे काम अर्थातच सोपे नव्हते. प्रशासन-पोलिस-सांकेतिक भाषातज्ञ यांच्या मदतीने तिच्या पालकांचा अखंड शोध सुरु होता.गीताची कहाणी वृत्तवाहीन्या, वर्तमानपत्रे आणि सोशल मिडियाद्वारे सर्व समाजात पोहचली होती. तिच्या आईवडिलांचा शोध सुरु असतानांच वाळुज येथील मीनाबाई पांढरे यांना या विषयाची माहिती मिळाली व त्यांनी गीता आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं.
मीना यांचा विवाह जिंतुर येथील सुधाकर वाघमारे यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. गीता ( बालपणीचे नाव राधा ) ही पाच वर्षाची असतांनाच जिंतुर येथुन निघुन गेली होती. पतीचे निधन झाल्यानंतर मीना यांनी दिनकर पांढरे यांच्याशी पुनर्विवाह केला. परभणी येथे जाऊन मीनाबाईंनी गीताची भेट घेतली असता तिने आपल्याला ओळखल्याचा दावा केला. तिच्या पोटावर जळाल्याची खूण असल्याचे त्यांनी सांगितले. तिला लहानपणी वाहनात बसण्याचा छंद असल्यामुळे ती पाकीस्तानात पोहचली असावी असेही त्या म्हणाल्या, चोविस वर्षानंतर माझी हरवलेली राधा भेटल्याचा आनंद आहे, मात्र तिचा सांभाळ करण्याची आपली अर्थिक परिस्थिती नाही. शासनाने मदत केल्यास बरे होईल,असे त्या म्हणाल्या.
सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने भारतात आलेल्या गीताला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. तिची संपूर्ण माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे.तिच्या जन्मदात्या आईवडीलांचा शोध घेतांना तिची फसवणूक होऊ नये,याची काळजी परराष्ट्र मंत्रालय आणि पहल फाऊंडेशन ही संस्था घेत आहे. म्हणूनच तिचे कुटुंबिय असण्याचा दावा करणार्यांची गीतासह डिएनए चाचणी झाल्याशिवाय गीताला त्यांच्याकडे सूपूर्द करण्यात येणार नाहीये.गीताचे वास्तव्य सध्या परभणी येथे अनिकेत शेलगावकर यांच्या पहल फाऊंडेशनमध्ये आहे. अनिकेत यांचे वडील डॉ. अशोकराव शेलगावकर हे प्रदीर्घ काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या “देश हमे देता है सबकुछ,हम भी तो कुछ देना सिखे” या संस्काराचे अनुसरण करत त्यांनी मुकबधीर ,कर्णबधीर मुलांसाठी “पहल फाऊंडेशनची स्थापना केली आहे.
अनिकेत हे स्वत: मुकबधीर आहेत. पहल संस्था स्वखर्चातून आणि मिळेल त्या सामाजिक सहकार्यातून गीताचे पालन पोषण करत आहे. त्यासाठी कुठलीही शासकीय मदत त्यांना मिळत नाही. ज्ञानेंद्र आणि मोनिका पुरोहित यांच्या सुचनेनुसार गीता त्यांच्याकडे राहत अाहे. रा.स्व.संघाचे पूजनीय सरसंघचालक डाॅ.मोहनजी भागवत हे इंदौर प्रवासात असतांना मोनिका पुरोहित यांनी त्यांना गीताविषयी माहिती दिली होती,तेव्हा महाराष्ट्राच्या प्रवासात आपण गीताला नक्की भेटू असे मोहनजी म्हणाले होते. त्यानुसार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी संभाजीनगर गीता आणि पहल फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांची भेट घेतली. गीता सध्या परभणीत राहते. पहल फाऊंडेशनमध्ये ती सध्या भारतीय सांकेतिक भाषा शिकत आहे. मराठी ,इंग्रजी आणि गणित शिक्षणही ती घेत आहे. तिला शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न अनिकेत शेलगावकर करत आहेत. भारताच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज या तर गीतासाठी आईच होत्या. त्या गीताला “हिंदुस्थान की बेटी” म्हणत असत. मध्यप्रदेशात असतांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानदेखील तिची नियमित चौकशी करत असत. जेव्हा सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याची बातमी गीताला कळाली तेव्हा तिच्या शोकाला पारावार राहिला नाही. जणू तिची आईच गेली होती. तिला अनाथ झाल्यासारखे वाटले. सुषमाजी तिच्याशी नेहमीच फोनवर बोलत असत. थावरचंद गहलोत यांना सांगुन सुषमाजींनी तिच्या अभ्यासासाठी लॅपटाॅप उपलब्ध करुन दिला होता. तिच्या मनात सुषमा स्वराज यांच्याविषयी हळव्या आठवणी आहेत.
सुषमाजी असोत किंवा परभणीचे डॉ. शेलगावकर ,ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेली माणसे. देशबांधवाप्रती विलक्षण आत्मियता हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.पाकिस्तान ते परभणी अशी ही गीताची कहाणी आहे. ज्या काळजीने व प्रेमाने गीताचे पालन पोषण व सांभाळ होत आहे त्यावरून सुषमाजींच्या शब्दातील “गीता ही हिंदुस्थानची बेटी” आहे, हे बिरुद सार्थक ठरले आहे. !
लेखन – रवींद्र सासमकर
( विश्व संवाद केंद्र, देवगिरी )