आपला प्राधान्यक्रम गंडला आहे
काल राहुल बजाज यांचे निधन झाले. कोणत्याही न्यूज चॅनेल ने एक २ मिनिटाची बातमी देण्यापलीकडे काहीच केलेले नाही. हेच एखादा सेलिब्रिटी असता,राजकीय नेता असता, अगदी एखादा तस्कर गुंड असता तर दिवसभर बातम्या चालल्या असत्या. त्यांचा अख्खा इतिहास हजार वेळा सांगितला असता. पण बजाज यांचे जीवनचरित्र सांगावेसे कुणालाही वाटले नाही. कुणालाही त्यांचा जीवनप्रवास सांगावा वाटला नाही. ५ कोटी टर्नओव्हर असणारी कंपनी १० हजार कोटी टर्नओव्हर करणारी कशी बनली कुणालाही सांगावसं वाटलं नाही. कुणाला ते ऐकण्याची इच्छा सुद्धा नाही. आपला प्राधान्यक्रम गंडला आहे
अशा यशस्वी लोकांचं चरित्र देशातील लाखो उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत असतं. पण कुणाला कसलं काही देणं घेणं नाही.
काही वर्षांपूर्वी जेफ बेझोस भारत दौऱ्यावर आले होते. न्यूज चॅनेल नि तर दखलच घेतली नव्हती, वर्तमानपत्रांनी सुद्धा आतल्या पानावर एका कोपऱ्यात बातमी दिली होती. त्यावेळी सुद्धा ती संधी साधून त्यांच्या व्यावसायिक यशाबद्दल कुणालाही चर्चा करावीशी वाटली नव्हती… त्याच काळात काही इतर देशांच्या प्रमुखांचे दौरे चालू होते, तर दिवसभर त्याच त्याच बातम्यांचा रतीब चालू होता. आपला प्राधान्यक्रम गंडला आहे हे मी त्यावेळीही म्हणालो होतो, आजही त्यात काडीचाही बदल झालेला नाही.
राजकीय नेते, डॉन, गँगस्टर, गुंड, तस्कर यांच्यावर बिग बजेट चित्रपट येत आहेत, पण एकाही उद्योजकाच्या आयुष्यावर कुणालाही चित्रपट काढावासा वाटत नाही. हे चित्रपट सुपरहिट सुद्धा होत आहेत. लहान लहान पोरांना देशातले डॉन, गुंड, तस्कर आदर्श वाटायला लागले आहेत. त्यांच्यासारखं वागणं, बोलणं, दिसतं हा स्टेटस सिम्बॉल झाला आहे. यांची नाव सुद्धा तोंडपाठ झाली आहेत, पण देशातल्या १० टॉप च्या उद्योजकांची नाव सांगा म्हटलं तर कुणालाही सांगता येणार नाही.. आपला प्राधान्यक्रम गंडला आहे. देशात गुंडगिरी दाखवणाऱ्या दहा चित्रपटामागे एक उद्योगावर आधारित चित्रपट एवढे सुद्धा प्रमाण नाहीये.
भ्रष्टाचाराने बरबटलेले, कित्येकांचे मुडदे पडून पुढे राजकारणात सेटल झालेले, कित्येकांना लुबाडून मोठे झालेले, बेकायदेशीर धंदे उजळ माथ्याने करणारे, दिवस रात्र हफ्ते गोळा करण्यात मग्न असणारे, उद्योजकांकडून खंडण्या गोळा करणारे मोठमोठे नेते आपले दैवत असतात, आपले बाप असतात आणि कष्ट करून, दिवस रात्र मेहनत घेऊन आपले उद्योग विश्व निर्माण करणारे, हजारो लाखो हातांना रोजगार देणारे उद्योजक मात्र चोर असतात. आपला प्राधान्यक्रम गंडलेला आहे…
सोशल मीडियावर राजकीय पोस्ट वर हजारो लाखो कमेंट, लाईक्स, शेअर मिळतात आणि बिजनेस पोस्ट ला त्याच्या १०% सुद्धा प्रतिसाद नसतो… आपला प्राधान्य क्रम गंडला आहे.
आपला प्राधान्य क्रम पूर्णपणे गंडलेला आहे. कोणतंही व्हिजन नसलेला, मिशनचा पत्ता नसलेला आपला समाज झाला आहे. आपल्या पोरांना कसं घडवायचं कुणाला काही कळत नाहीये, फक्त त्याला इंग्लिश आलं पाहिजे एवढाच आपला क्रायटेरिया झाला आहे.
देशात टाटा, बजाज, अंबानी यांच्यासारखे चार पाच नाही तर किमान ५० उद्योजक असणे आवश्यक आहे. जगावर राज्य गाजवायचं असेल तर उद्योगजगतावर राज्य गाजवाव लागतं हे बेसिक सुद्धा कुणाला झेपत नाहीये. देशातल्या फक्त टॉप २० कंपन्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे १ कोटी पेक्षा जास्त रोजगार निर्माण करतात, हे तरी किती जणांना माहित आहे?
आपला प्राधान्यक्रम गंडलेला आहे…
- श्रीकांत आव्हाड