CultureOpinion

सिंधू संस्कृतीतील खेळ आणि खेळणी

१९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतर मोहेंजोदाडो, हडप्पा, तक्षशीला, छानुदाडो ही उत्खनन केलेली, प्राचीन गावे पाकिस्तानकडे गेली. भारताचा समृद्ध वारसा सांगणारी ही स्थळे एका रात्रीत परकी झाली. भारतीय पुरातत्व विभागाला हे शल्य स्वस्थ बसू देईना. स्वतंत्र भारतात, पुरातत्व विभागाने सिंधू संस्कृतीच्या गावांचा शोध तातडीने सुरु केला. अत्यंत दुर्गम भागात जिथे रस्ते आणि गाड्यांची सोय नव्हती, तिथे ASI च्या अधिकाऱ्यांनी अक्षरश: बैलगाड्यांमधून आणि उंटावरून प्रवास केला. सर्वेक्षण केले, स्थानिक लोकांशी बोलले आणि प्राचीन वस्तींचा शोध घेऊ लागले. जिद्दीने चाललेल्या या कामाला लवकरच फळ मिळाले – १९५० पर्यंत ७० स्थळांचा शोध लागला! फाळणीच्या जखमेवर ही एक हलकी फुंकर होती!

पाकिस्तानने देखील चुरशीने सिंधू खोऱ्यातील गावे शोधली. नवीन नवीन स्थळे सापडत जाता लक्षात आले की – सरस्वती नदीचे कोरडे पात्र समजले जाणाऱ्या घग्गर व हकाराच्या पात्रांवर या संस्कृतीची सर्वाधिक स्थळे आहेत. त्यामुळे जी सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जात होती, ती सरस्वती – सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जावी अशी मागणी होऊ लागली. तर म. के. ढवळीकारांच्या मते, सात नद्यांच्या काठांनी ही गावे वसली असल्याने या संस्कृतीला ‘सप्तसिंधू संस्कृती’ हे नाव अधिक योग्य आहे.

तर, या सप्तसिंधू संस्कृतीची साधारण ४०० स्थळे पाकिस्तान मध्ये तर ११०० भारतात आहेत. त्यापैकी ६००+ स्थळे सरस्वती नदीच्या खोऱ्यात आहेत. त्या पैकी निम्म्याहून कमी स्थळांचे उत्खनन केले गेले आहे. तसेच उत्खनन न केलेल्या व ज्याला ASI चे संरक्षण नाही अशी स्थळे मानवी अतिक्रमणामुळे जलद गतीने नष्ट होत आहेत. उत्खनन केलेल्या स्थळातून अनेक मातीच्या मुद्रा मिळाल्या आहेत, परंतु त्यावर लिहिलेला मजकूर सर्वमान्य रित्या वाचता आला नाहीये. असे अनेक अडथळे ओलांडून या संस्कृतीची ओळख करून घ्यावी लागते ती उत्खननात सापडलेल्या वस्तूंमधून व वास्तूंमधून.

या संस्कृतीची वैशिष्ठ्ये कळतात ती अशी– आखणी करून बांधलेली नगरे, नगरांना असलेली तटबंदी, त्यामधील काटकोनातील रस्ते, दोन किंवा तीन मजली घरे, घराघरात संडासची सोय, सांड पाण्याचा भुयारी मार्गाने निचरा करण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी वेगळी भुयारी व्यवस्था, पाणी साठवण्यासाठी मोठे हौद, विहिरी, धरणे, काही घरात मिळालेली यज्ञकुंड, दूर देशांशी चाललेला व्यापार, समुद्र मार्गाने व्यापार, जहाज बांधणी व दुरुस्ती करण्याची सोय, हस्तिदंताच्या वस्तू, दगडांपासून मणी व मण्यांपासून दागिने तयार करणारे कारखाने, नक्षीदार मातीची भांडी इत्यादी मधून ही संस्कृती प्रकट होते.

येथे केलेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून, येथील मुले कोणते खेळ खेळायचे, त्यांची खेळणी काय होती, मोठी माणसे सुद्धा काही खेळायची का, आदि गोष्टींचा मागोवा घेऊ. आपण पाहणार आहोत तो प्रदेश आहे – हरयाणा, पंजाब, राजस्थान, सिंध आणि गुजरातचा, आणि काळ आहे साधारण सामान्य युग पूर्व ७,५०० (7,500 BCE) ते सामान्य युग पूर्व १,५०० (1,500 BCE) दरम्यानचा. तरीही मुख्यत्वेकरून हे खेळ आहेत ४ ते ५ हजार वर्षांपूर्वीचे.

अगदी लहान मुलांसाठी असलेले खेळ प्रथम पाहू. लोथल येथे दोन सुबकशी मातीची भांडी मिळाली. त्या भांड्यांवर काळ्या रंगाच्या शाईने सुंदर चित्र काढले आहे. एक चित्र आहे – तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीचे. तळाशी पाणी गेलेल्या मडक्यात कावळा दगड टाकतो, आणि पाणी वर आल्यावर पाणी पिऊन तहान भागवतो. तर दुसरे चित्र आहे – चोचीत पुरी धरून झाडावर बसलेल्या कावळ्याचे. झाडाखाली एक लबाड लांडगा पुरीकडे आशाळभूतपणे पाहत आहे. आता तो लांडगा कावळ्याच्या गाण्याची स्तुती करणार, आणि कावळ्याने गाणे म्हणायला चोच उघडताच पुरी खाली पडली, की ती घेऊन तो पळून जाणार! ही भांडी  पाहून वाटते की, अरे! हे लहान मुलांसाठी केलेले चित्रांचे गोष्टीचे पुस्तक तर नाही! कोणा गुड्डी आणि बंटीची ही ठरलेली वाडगी होती का? दुपारच्या वेळी आई  त्यांना त्यांच्या ठरलेल्या वाडग्यातून खाऊ देत असे. मग गुड्डी आणि बंटी पायरीवर बसून खाऊ खातांना आपापल्या वाडग्यावरच्या चित्रातली गोष्ट एकमेकांना सांगत असतील का?

उत्खननातून वितभर किंवा त्याहून लहान मातीच्या पुतळ्या मिळाल्या आहेत. कोणी त्यांना मातृदेवता म्हणतात. कोणी शोभेच्या वस्तू म्हणतात. त्या लहान मुलींच्या खेळण्यातील बाहुल्या असतील का? आणखी मिळाली आहेत, छोटी छोटी भांडीकुंडी. पिटुकली वाटी, इत्कुसं ताट, लहानसा माठ, बारीकसा झाकणाचा सट आणिक काय काय. कुणा छकुलीने मैत्रिणींबरोबर ओसरीवर भातुकलीचा खेळ मांडला असेल का? पिटुकल्या वाटीतून खोटी-खोटी आमटी पितांना छकुलीने मैत्रिणीला फू-फू करून प्यायला सांगितले असेल?    

आणि कोणा बंड्याने कधी “आता मी काय करू?” असे म्हणून फार कटकट केली, तर त्याची आई त्याला हा चक्रव्यूहाचा खेळ काढून देत असावी. मग थोडा वेळ एकट्याने बसून बंड्या हा खेळ खेळला असेल. मातीचे पिटुकले चेंडू चक्रव्यूहातून फिरवत फिरवत, खाली न पडता बरोब्बर मध्यभागी घेऊन जायचे!

लहान मुलांसाठी तयार केलेल्या सुंदरशा, पक्ष्यांच्या आकारातील अनेक शिट्ट्या मिळाल्या आहेत. अशा शिट्ट्या पाकिस्तान आणि भारतातील ग्रामीण भागात अजूनही मिळतात. एखाद्या सुस्त दुपारी, कुणा उनाड पोरांनी, या शिट्ट्या वाजवून वाजवून खूप आवाज केला असेल का?

खेळण्यातले मातीचे प्राणी आणि पक्षी देखील मिळाले आहेत. बैल, म्हैस, बकऱ्या, मेंढ्या, डुक्कर, वाघ, घोडा, गेंडा, माकड, कबुतर वगैरे प्राण्यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती. कदाचित लहान मुले आपापली चित्रे घेऊन एकमेकांकडे खेळायला जात असतील. त्यांच्या मेंढ्या एकमेकांना खोटी खोटी टक्कर देऊन शक्ती दाखवत असतील. किंवा सगळ्या गुरांना घेऊन चिंटी पिंटी पोरं, शेजारच्या अंगणात चरायला नेत असतील. 

काही प्राण्यांना पायाशी फिरणारी चाके आहेत. त्यांना धरून ‘गाडी – गाडी’ करत फिरवले असेल. नुकतंच  चालायला लागलेली ठकी अशा प्राण्याची दोर हातात धरून त्याला घेऊन घरभर फिरली असेल. काही प्राण्यांची डोकी दोरीने पाठीला बांधली आहेत. मागून दोरी ओढली की तो प्राणी मान वर-खाली करतो. खेळायला आलेल्या पिंटूने मान डोलवणारा बैल असलेल्या चिंटूला, विचारले असेल – “सांग सांग भोलानाथ! पाऊस पडेल काय?” मग चिंटूने त्याच्या नंदीबैलाची मान वर खाली करून “हो! पाउस पडणार!!” असा संकेत दिला असेल! काय सांगावे?

दोरीने हलवता येणाऱ्या प्राण्यांच्या व स्त्री पुरुषांच्या बाहुलीचे कठपुतलीचे खेळ केले असावेत. काही मातीचे मुखवटे सापडले आहेत त्या वरून असा अंदाज व्यक्त केला जातो की वेगवेगळे मुखवटे लावून कलाकार नाटकांचे खेळ सदर करत असावेत. धोलाविरा येथे एका रंगमंचाचे अवशेष सापडले आहेत. त्यावरून मनोरंजनासाठी असे खेळ करत असावेत असे वाटते.   

या गावांतील उत्खननातून अनेक लहान गाड्या सापडल्या आहेत. या छोट्या हातगडीत भाजी ठेवून, कोणी बिट्टू “भाजी घ्या भाजी! ताजी ताजी भाजी!” म्हणत फिरला असेल. या सुबकशा बैलगाडीत भोलुने एक छोटासा गाडीवान बसवला असेल, अन् गाडीत गवताच्या लहान लहान पेंढ्या, नाहीतर भांडी भरून, वडिलांसारखं दुसऱ्या गावी समान विकायला घेऊन चालला असेल! आपली गाडी पळवत तो म्हणाला असेल, “ए! सरका सरका! बाजूला व्हा! माझ्या सर्जा राजाची गाडी चालली रे चालली! हुर्रर्रर्र!!”

थोड्या मोठ्या मुलांच्या खेळातल्या चकत्या सापडल्या आहेत. भाजलेल्या माती पासून केलेल्या एकापेक्षा एक लहान चकत्या, एकमेकांवर रचून ठेवताच मनात आरोळी उठते “ल S गो S री S S !” चिंध्यांचा चेंडू करून आज सुद्धा हा खेळ पाकिस्तान आणि भारतातील मुले खेळतात. तसेच मातीपासून तयार केलेल्या गोट्या आणि भोवरे मिळाले आहेत.

काही बैठे खेळ सापडले आहेत जसे – बुद्धिबळासारखा वेगवेगळ्या प्रकारच्या सोंगट्या असलेला पट सापडला आहे. हा बुद्धिबळाचा प्राचीन प्रकार असावा असे मानले जाते. तसेच दगड, माती व हाडापासून तयार केलेले विविध प्रकारचे dice मिळाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आखीव रेखीव पट सुद्धा मिळाले आहेत. लहान खळगे असलेला एक पट मिळाला आहे. त्यावर चिंचोके वापरून खेळले असावेत असे वाटते.

खेळांमध्ये व्यायाम धरायचा असेल, तर असे वाटते की सिंधू संस्कृतीच्या लोकांना योगासने माहित होती. योगासनाच्या वेगवेगळ्या मुद्रेतील मातीच्या कैक बाहुल्या मिळाल्या आहेत. कदाचित शोभेच्या बाहुल्या म्हणून त्या तयार केल्या असाव्यात. किंवा त्यांचा वापर योगासने शिकवण्यासाठी सुद्धा केला गेला असेल. कोण जाणे! हे लोक कुस्ती सारखे काही खेळ खेळायचे का? कोंबड्यांची किंवा मेंढ्यांची झुंज लावायचे का? एखादा पैलवान प्राण्याला झुंज द्यायचा का? असे प्रश्न अजूनतरी अनुत्तरीतच आहेत.

या प्राचीन काळातल्या, मातीत गढलेल्या वसाहतींमधले काय टिकले आहे, तर दगडाच्या, तांब्याच्या आणि मातीच्या वस्तू. बाकी कापडाच्या, लोकरीच्या, चामड्याच्या किंवा लाकडापासून तयार केलेल्या वस्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला मिळतात ती फक्त मातीची आणि दगडाची खेळणी. लहान मुलींसाठी कापडाच्या बाहुल्या केल्या असतील तर ते कसे कळणार? किंवा रंगीत कापडाचे चौकाड्यांचे पट केले असतील तर कोणास ठाउक? किंवा विटीदांडू सारखा लाकडी वस्तूंनी खेळलेला खेळ असेल तर काय जाणो? या खेळांबद्दल जर कुठे लिहून ठेवले असेल तर एक मार्ग आहे. पण ते भूर्जपत्रावर लिहून ठेवले असेल तर काय उपयोग? तो लेख दगडावर नाहीतर मातीच्या tablet वर कोरला असता तर ठीकय. अर्थात, या लोकांनी लिहिलेले अजून वाचता येत नाही तो प्रश्न वेगळाच. असो. कसे कळावेत त्यांचे सगळे खेळ? शिवाय  इतर खेळ जे कोणत्याही साहित्याशिवाय खेळले जातात, जसे – सूरपारंब्या, पकडापकडी किंवा लपाछपी हे चित्रित करून ठेवले असतील तरच कळणार. ते सुद्धा दगडावर किंवा मातीच्या खापरावर चित्रित / मुद्रित केले असतील तरच.

अशा अनेक जर-तर मधून मिळणारे धागेदोरे अगदी थोडे आहेत. त्या सर्व पुराव्यांना धरून बांधता येतात ते केवळ अंदाज. आणि त्यामधून उमटते ते एक पुसटसे चित्र. जे पूर्ण दिसत नसल्याने अधिक आकर्षक होते. जे अस्पष्ट असल्याने बारकाईने पाहायला लावते. आणि जे उत्तरे देण्यापेक्षा आपल्यालाच प्रश्नांवर प्रश्न विचारते, “ओळख पाहू, हा खेळ कोणता असेल! असा खेळ तुझ्या लहानपणी होता का? आणि सांग बरे, चीत केल्यावर आम्ही काय म्हणून चित्कार करायचो? सांग! सांग!! सुटतंय का कोडं? की हरलास?”

  • दीपाली पाटवदकर  
Back to top button