शिक्षणाच्या गुणवत्तेची व्यवहारातील सार्थकता अधिक महत्वाची आहे.
माणसाला आकार देऊ शकणारा शिक्षण नावाचा व्यवसाय समाजाच्या, राष्ट्राच्या उभारणीचा महत्वाचा घटक आहे. भारतात अगदी पाच हजर वर्षापासून शिक्षण पद्धती आणि तत्व प्रचलित आहे. शिक्षणाचा संबंध जितका अधिक मानवी जीवनाशी आहे तितकेच त्याचे गुणवत्तेच्या संदर्भात आजचे स्वरूप आणि अंतिम साध्य नेमकी काय आहे ह्याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शिक्षणाचे स्वरूप, पद्धती, परिणाम आणि त्याचे होणारे फायदे ह्या अर्थाने गुणवत्ता अधिक महत्वाची आहे.
मन, बुद्धी आणि शरीर ह्याचा विकास ह्या दृष्टीकोनातून भारतीय शिक्षण आकाराला आले आहे. “एकोहम् बहुस्याम:” अशी रचना सृष्टीच्या निर्मात्याने केली आहे. स्वामी विवेकानंद शिक्षणाच्या बाबतीत संपूर्ण सजग अवस्था असं वर्णन करताना “अमृतस्य पुत्रा:” असं मानवी जीवनाचे वर्णन करतात.जगातील सर्व धर्म हे मानवी आयुष्याच्या बाबतीत परमेश्वर स्वरूप, ईश्वराचा आत्मा माणूस, ईश्वराचे काम करणारा अशी वेगवेगळी पण एकच अर्थाची धारणा करणारे आहेत. पूर्णत्वाचा संस्कार करणारे शिक्षण हे माध्यम आहे.
योग्य दिशेने घेऊन जाणारे शिक्षण तत्व, राजस आणि सत्व गुणांनी युक्त आहे. भारतीय साहित्य शिक्षणाचा पंचेद्रीयाच्या सहाय्याने विचार करणारे आहे. पंचेद्रिय हे जेंव्हा मनाशी जोडले जातात तेंव्हा त्यांच्या सहाय्याने आपण घेत असलेला जगाचा अनुभव हे शिक्षणाचे तत्व आहे. मानवी मनाची क्षमता आणि नियंत्रण हे ध्येय गाठताना शिक्षण उर्जेच्या रुपात काम करते.
शिक्षणाची गुणवत्ता ही मानवी मनाला संवेदनाचा योग्य अर्थ, चांगले वाईट ह्याचे ज्ञान, स्वत्वाचा पूर्णत्वाच्या दिशेने होत असलेला प्रवास आणि शेवटी आदर्शाकडून देवत्वाकडे जाणारी वाट आहे. शिक्षणाच्या गुंवात्तेकडून आपल्याला नेमकी काय अपेक्षित आहे. नुसते इंजिनियर, क्लार्क अपेक्षित नाहीत. कौशल्य फक्त हे तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून महत्वाचे नाही तर एक अधिक चांगले वडील, आई, नवरा किंवा बायको, शेजारी व सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्थेचे चांगले घटक म्हणूनही अपेक्षित आहेत. शिक्षणाची गुणवत्ता ही वैयक्तिक ध्येयापेक्षा सामाजिक ध्येयाने अधिक आवश्यक आहे. नुसते ध्येय असूनही चालणार नाही त्याची व्यवहारातील सार्थकता सुद्धा महत्वाची आहे.
शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांना एकमेंकांशी जोडणारे, आकार धारण करणारे ज्ञान आहे. सहशिक्षणाचा संस्कार रविंद्रनाथ टागोर असा सांगतात जोपर्यंत एखादी मेणबत्ती स्वतः जळत नाही तोपर्यंत आपण दुसरी मेणबत्ती पेटवू शकत नाही. शिक्षणात नुसती माहिती देऊन उपयोगाची नाही तर त्याचे उपयोजन निर्माण करता आले पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता समाजाच्या संपूर्णतेचे प्रतिक आहे. “सा विद्या या विमुक्तये” हा शिक्षणाचा हेतू आहे. हेच आचार्य विनोबा भावे प्रकृती, विकृती आणि संस्कृतीच्या आधारे शिक्षणाचा संस्कार समजून सांगतात. स्वत्वाचा योग्य सामाजिक अर्थ लावणारे शिक्षण गुणवत्तेच्या दृष्टीने अधिक मुलभूत आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेची तात्विक बैठक ही शाळा, महाविद्यालयाच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. रोबोट यंत्रणेचे स्वरूप धारण करणारे मानवी शिक्षण अपेक्षितच नाही. माणसाचा संपूर्ण सर्वांगीण विकास ही धारणा आहे. शिक्षणात असलेली नाविन्यता सातत्याने अशाच गुणवत्तेचा अधिक शोध घेणारी निर्माण होण्याची गरज आहे.