संस्कृतमध्ये सगळ्या जगाची भाषा बनण्याचे सामर्थ्य : डॉ. विजय भटकर
पुणे, २५ मे : भाषाशास्त्रदृष्ट्या संस्कृत ही सर्वात उत्तम भाषा आहे. एका भाषेचे दुसऱ्या भाषेत भाषांतर करण्यासाठी संस्कृत ही मध्यस्थ भाषा होऊ शकते. जगातील अनेक देशात फिरल्यानंतर माझ्या अभ्यासातून असे लक्षात येते की विविध भाषांच्या उच्चारणासाठी आधारभूत म्हणून संस्कृतचा अभ्यास करणे उपयुक्त आहे. या दृष्टीने देशातील संगणकतज्ज्ञ संशोधन करत आहेत, असे उद्गार सुप्रसिद्ध संगणक तज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी मंगळवारी काढले.
संस्कृतच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या संस्कृत भारती संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील संभाषण शिबिर घेणाऱ्या शिक्षकांच्या १२ दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भटकर बोलत होते. संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख शिरीष भेडसगावकर हे यावेळी मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.
डॉ. भटकर पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राजभाषा म्हणून संस्कृतचे समर्थन केले होते. भविष्यकाळात केवळ भारतातच नाही तर जगालाही संस्कृत भाषेचा स्वीकार करावा लागेल. संस्कृतमधील ज्ञानभंडार पाहिले तर मानवी संस्कृतीच्या विकासासाठीसुद्धा संस्कृतचा अभ्यास आवश्यक आहे. सामान्य व्यवहारात संस्कृत भाषा आणण्याचा संस्कृत भारतीचा हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा व कौतुकास्पद आहे.
मला संस्कृत येत नाही याचे मनापासून वाईट वाटते. आजही मला संस्कृत बोलायला शिकण्याची इच्छा आहे, असेही डॉ. भटकर यावेळी म्हणाले.
वर्गाधिकारी डॉ. रामचंद्र शिधये यानी प्रास्ताविकात वर्गाची माहिती देताना सांगितले की पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून प्रशिक्षणार्थी आले. समाजाच्या विविध स्तरातील व विविध व्यवसायातील व्यक्ती महाविद्यालयीन तरुण यांनी या वर्गात भाग घेतला.
हे प्रशिक्षणार्थी समाजात संस्कृतचे प्रशिक्षक म्हणून काम करतील. कार्यक्रमात प्रशिक्षितांनी संस्कृत संभाषण कौशल्याची विविध प्रात्यक्षिके सादर केली. श्री. अभिजित कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. रमेश जोशी यांनी आभार व्यक्त केले.