स्वामी विवेकानंद विचार दर्शन फिरते पुस्तकालय प्रदर्शनाला ठाण्यात सुरुवात
पत्रकार, लेखक मकरंद मुळे यांच्या हस्ते झाले उपक्रमाचे उदघाटन
ठाणे, दि. २५ मे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांनी बेल्लूर येथे स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त पुणे येथील रामकृष्ण मठाने फिरत्या पुस्तकालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय विवेकानंद विचार दर्शन प्रदर्शन उपक्रम आयोजित केला जात आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन पत्रकार, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह, राष्ट्रीय मतदाता मंचाचे सदस्य मकरंद मुळे यांच्या हस्ते येथील पूर्व भागातील अष्टविनायक चौकात करण्यात आले.
उदघाटनाच्या निमित्त बोलताना मकरंद मुळे म्हणाले ठाणेकर या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देतील. हे फिरते पुस्तक प्रदर्शन स्वामी विवेकानंद यांचे विचार महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी यांच्या पर्यंत पोहचविण्यास उपयुक्त ठरेल असे सांगून मकरंद मुळे यांनी पालकांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. ठाणे शहर आणि परिसरात दिनांक पंचवीस मे ते पाच जून बारा दिवस हे फिरते पुस्तक प्रदर्शन आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम परिसरात, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा जंक्शन, दादोजी कोंडदेव स्टेडियम, यासह डोंबिवली रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम भाग, कल्याण रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम भाग, उल्हास नगर आणि कळवा याठिकाणी या फिरत्या पुस्तकालयाचे प्रदर्शन आयोजित केले आहे. स्वामी विवेकानंद विचार दर्शन फिरत्या पुस्तकालयाला भेट देण्याचे आवाहन रामकृष्ण मठाचे अध्यक्ष श्रीमत स्वामी श्रीकांतनंदजी महाराज यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ९८९२६ १६८७४, ८७५५१ ८८००७ या क्रमांकावर संपर्क करावा असे आयोजकांनी म्हटले आहे.