HinduismNewsSpecial Day

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील स्वधर्म…

Vishva Hindu Parishad..

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

भावार्थ : हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी होते आणि साधू सज्जनांना त्रास होतो तेव्हा तेव्हा सज्जनांच्या संरक्षणासाठी धर्माच्या उत्तम प्रकारे स्थापनेसाठी मी युगायुगात अवतार धारण करून येतो.

षड्गुण ऐश्वर्याच्या प्रमाणात। अंश पूर्ण आदी प्रकार त्यात ॥
ज्ञानी, कर्तबगार, निरासक्त। उदार श्री यश संपन्न ॥ ग्रामगीता ॥

सहा गुणांपैकी एका गुणांची परमोच्य स्थितीला प्राप्त होवून अवतारात धर्माच्या संवर्धनाचे कार्य जपी तपी ऋषीमुनी, साधू-संत सज्जन करीत असतात. परंतु धर्माच्या १४ उपांगे आणि षड्‌गुणांची परमोच्यपुर्ती एका जन्मात (अवतारात) धारण करणाऱ्या अवतारास ‘पूर्णावतार’ अस शास्त्र संबोधते. या अर्थाने योगेश्वर भगवान श्रीकृष्ण पूर्णपुरुषोत्तम या अधिकाराने धर्माच्या स्थापनेच आम्हास आश्वासन देतात, असे भगवान व्यास महर्षी म्हणतात.

आत्मरुपाची धारणा। सर्वासाठी समभावना ॥
विश्व कुटुंब ऐशा आचरणा। धर्म म्हणावा निश्चए ॥

आपल्या आत्म्याची जी धारणा आहे आत्मा म्हणजे स्वरूप जो पंचमहाभूतांनी नटलेल्या २४ तत्वांनी शरीराला प्रकृतीच (सृष्टीच) चक्र चालविण्यासाठी प्रेरित करतो साधनांनी जप-तप-योग-याग, सत्कर्माच्या निरंतरतेने स्वरुपाची (आत्म्याची) साक्षात्कार होतो. मनुष्य देहाकडून धर्माच आचरण होते.

स्वधर्म म्हणजे आत्मधर्म, आत्माचा स्वभाव सत्य, ज्ञान, प्रेम। यासाठी करणे जीवाचा होम, श्रेयस्कर हे सर्वा ॥

यात स्वधर्म विषद करतांना, स्वधर्म म्हणजे आत्मधर्म, जे मुलमार्गी आहे. तत्वाला कायम ठेवून स्थल, काल, परिस्थितीनुरूप साधनांची निशित्वर न्यायिक पद्धतीने ईश्वराच यथार्थ सृष्टीच कार्य चालविणे होय. यात स्वधर्म पुढे येत असतांना परधर्म पण सहज सोबत येतांना दिसतो. कारण प्रकृती तीन गुणांनी बनलेली आहे. (रज, तम, सत्व) म्हणून परधर्म हा राष्ट्रसंत स्पष्ट करतात.

परधर्म म्हणजे विकारधंता।
स्वधर्म म्हणजे न्यायसिद्धता ।।

आधुनिक काळात (युगांत) अनेक पथांना, संप्रदायांना धर्माची नामभिदाने दिल्याने स्वधार्माकडे येणारा मार्ग भरकटलेला दिसून येतो. धर्म एकच परंतु सृजनाच्या कार्यात मुलतत्व कायम ठेवून सृष्टीच्या निर्मितीसोबत भिन्न प्रकारे उदयाला आला. परधर्म हा धर्माच्या नामाभिदानांसी याचा सबंध नाही, तर तो विकाराधन्तेशी आहे. असे राष्ट्रसंत म्हणतात.

भिन्न धर्माचा जन्मही नव्हता। मग परधर्म का सांगे गीता ?
तेथे कर्तव्याचीच भिन्नता। ध्यानी तियेच्या ॥

स्वधर्म हा मनुष्याच्या कर्तुत्वाशी आचरणाने जोडला आहे. राष्ट्रसंतानी एका मनुष्याचा धर्म काय असावा ? तर तो व्यक्तिगत नसून त्याचा संबंध आपल्या अवती-भवती असणाऱ्या प्रत्येकासी आहे.

विष्णुमय जग हाच धर्म, ऐसे संती कथीले वर्म।

राष्ट्रसंताच्या एकंदरीत साहित्यातील स्वधर्म जाणून घेतांना स्वधर्म हा व्यक्तीधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, ग्रामधर्म मिळून बळकट ‘राष्ट्रधर्म’ उभारणीचा मुख्य उद्देश दिसून येतो. याच सप्रमाण स्पष्ट करतांना पुढे राष्ट्र हे विश्वाला शांतीदायी अर्थात विश्वगुरुच्या स्थानी राहो म्हणून.

व्यक्तीधर्म, कुटुंबधर्म। समाजधर्म, गावधर्म।
बळकट होई राष्ट्रधर्म। प्रगतीपथाचा ।।
व्यक्ती व्हावि कुटुंबपूरक। कुटुंब व्हावे समाजपोषक ।
तैसेची ग्राम व्हावे राष्ट्राहाय्यक। राष्ट्र विश्वा शान्तिदायी ॥

धर्म हा सिद्धांत आहे तत्वाचा आणि तत्वांची लक्षणे हे धर्माचा पाया आहे.राष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वधर्माच्या आचरणाने राष्ट्रधर्माची धारणा सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून ग्राम हा परिपूर्ण, सर्वांगपूर्ण व्हावा.

“हिन्दव: सोदरा सर्वे |
न हिन्दू: पतितो भवेत् ||
मम दीक्षा हिन्दू रक्षा |
मम मंत्र: समानता ||“

या भूमीवरील सर्व हिंदू सहोदर (म्हणजे एकाच मातेच्या उदरातून आलेले भाऊ) आहेत. कोणताही हिंदू पतित नाही. हिंदूंचे रक्षण करणे – हीच दीक्षा आहे. समरसता, समानता हा आमचा मंत्र आहे.

असा श्लोक भारतातील सर्व संत महंत, शंकराचार्य, महामंडलेश्वर यांनी एकत्र येऊन १९६५ या वर्षी सांदिपनी आश्रम, पवई, मुंबई येथे विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या निमित्ताने निर्माण केला आहे. संत तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य होते. १९६६ मध्ये प्रयाग व १९६७ मध्ये नाशिक येथे झालेल्या संमेलनांचे ते अध्यक्ष होते.

अध्यात्म आणि हिंदुत्वाच्या धाग्यात भारतीय समाज एकत्र यावा, समरस समता पूर्ण व्हावा असा संत तुकडोजींचा उद्देश होता. संस्कृती हा राष्ट्रीयत्वाचा भक्कम आधार असतो. परकीय सत्ता ही गुलाम देशाच्या संस्कृतीवर आघात करीत असते.जेणेकरुन त्या समाजाला आपल्या संस्कृतीचा विसर पडावा. अशा समाजावर परकीय सत्तेला जास्त काळ राज्य करणे सोपे जाते. राष्ट्र हे लोकांचे असते.लोकसंस्कृती ही राष्ट्राची ओळख असते. संस्कृतीचा प्रवाह जेवढा प्रवाहीत असेल तेवढे राष्ट्र प्रबल असते.हा प्रवाह अवरूद्ध झाला की राष्ट्र दुर्बल होते.असे राष्ट्र परकीय सत्तेशी लढू शकत नाही.

अरे, उठा उठा श्रीमंतांनो । अधिकाऱ्यांनो, पंडीतांनो ॥
सुशिक्षितानो, साधुजन्नानो। हाक आली क्रांतीची ॥
गावा-गावासी जागवा। भेदभाव हा समूळ मिटवा ॥
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकड्या म्हणे ॥

३० एप्रिल हा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्म दिवस…राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या एकूणच जीवनकार्याकडे दृष्टिक्षेप टाकला असता ठळकपणाने आपणाला त्यांच्या जीवनात समाज परिवर्तनाची काही मूलभूत मूल्ये लक्षात येतात. ती म्हणजे अध्यात्म, ईश्वरभक्ती, सेवा, राष्ट्रीयता, समता, अध्यात्मिक उन्नती, स्त्री पुरुष समानता, आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट करणे, ग्रामविकास आदी. या मूल्यांच्या माध्यमातून त्यांनी एक राष्ट्रभक्त समाज निर्मितीचे कार्य केल्याचे दिसून येते..

अशा प्रेरणादायी राष्ट्रसंताच्या जीवन चरित्रातून आपण सुद्धा या प्राणप्रिय मातृभूमीसाठी कार्यरत होण्याचा मनोमन संकल्प करूया..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्रिवार अभिवादन..

लेखक :- श्री. अरविंद अमरसिंग राठोड

(लेखक ग्रामगीताचार्य असून संत साहित्याचे अभ्यासक आहेत)

Email id:- ar902258@gmail.com

Back to top button