
तीन दिवसीय व्याख्यानमालेचा दुसरा दिवस – ‘संघाची १०० वर्षांची यात्रा – नवे क्षितिज’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले की, समाज आणि जीवनातील समतोलच खरे धर्म आहे, जो कोणत्याही अतिरेकापासून आपल्याला वाचवतो. भारताची परंपरा यालाच मध्यम मार्ग म्हणते आणि आजच्या जगासाठी हेच अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, जगासाठी आदर्श बनण्यासाठी समाजपरिवर्तनाची सुरुवात घरापासून करावी लागेल. यासाठी संघाने ‘पंच परिवर्तन’ सुचवले आहेत – कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्व-बोध (स्वदेशी) आणि नागरिक कर्तव्यांचे पालन.“आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशीला प्राधान्य द्या आणि भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ स्वेच्छेनेच व्हावा, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नाही.”
डॉ. मोहन भागवत हे विज्ञान भवन येथे संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या (‘संघाची १०० वर्षांची यात्रा – नवे क्षितिज’) दुसऱ्या दिवशी बोलत होते. या वेळी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, उत्तर क्षेत्रप्रमुख पवन जिंदल आणि दिल्ली प्रांतप्रमुख डॉ.अनिल अग्रवाल मंचावर उपस्थित होते.
संघाचे कार्य कसे चालते?
मोहन भागवत म्हणाले, “संघाचे कार्य हे शुद्ध सात्त्विक प्रेम आणि समाजनिष्ठेवर आधारित आहे. संघाचा स्वयंसेवक कधीच वैयक्तिक लाभाची अपेक्षा करत नाही. इथे प्रोत्साहन (इन्सेन्टिव) नाही, उलट त्याहून अधिक अप्रत्यक्ष अडचणी आहेत. स्वयंसेवक समाजकार्य करताना आनंद अनुभवतात.” त्यांनी स्पष्ट केले की, जीवनाची सार्थकता आणि मुक्तीची अनुभूती ह्या सेवेमधूनच मिळते. सज्जनांशी मैत्री, दुर्जनांची उपेक्षा, चांगले करणाऱ्याबद्दल आनंद व्यक्त करणे आणि दुर्जनांप्रतीही करुणा बाळगणे – हेच संघाचे जीवनमूल्य आहे.
हिंदुत्व म्हणजे काय?
हिंदुत्वाबद्दल ते म्हणाले, “हिंदुत्व म्हणजे सत्य, प्रेम आणि आपुलकी.” आपल्या ऋषी-मुनींनी आपल्याला शिकवले आहे की जीवन हे केवळ स्वतःसाठी नसते. म्हणूनच भारताने जगासाठी मार्गदर्शक होण्याची भूमिका निभावली पाहिजे. येथूनच ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘विश्वकल्याण’ यांची संकल्पना जन्माला येते.
जग कुठल्या दिशेने जात आहे ?
सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली की, जग हे अतिरेकीपणा, संघर्ष आणि अशांततेच्या दिशेने चालले आहे. मागील साडेतीनशे वर्षांत उपभोगवाद आणि भौतिकतावादामुळे मानवतेची पातळी घसरली आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या ‘सात सामाजिक पापां’चा त्यांनी उल्लेख केला –
- कामाशिवाय संपत्ती,
- विवेकाशिवाय आनंद,
- चारित्र्याशिवाय ज्ञान,
- नैतिकतेशिवाय व्यापार,
- मानवतेशिवाय विज्ञान,
- बलिदानाशिवाय धर्म,
- तत्त्वांशिवाय राजकारण –हे पाप समाजात असमतोल निर्माण करतात.

धर्माचा मार्ग स्वीकारणे आवश्यक
सरसंघचालक म्हणाले की, “आज जगात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे जगाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा. जगाने धर्माचा मार्ग स्वीकारावा लागेल. इथे धर्म म्हणजे पूजा-पाठ किंवा केवळ कर्मकांड नव्हे. सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ असा धर्म म्हणजे समतोल. आपणही जगावे, समाजही जगावा आणि निसर्गालाही जपावे.”
धर्म म्हणजे मर्यादा आणि समतोलासह जगणे. हेच दृष्टिकोनानेच जगात शांती प्रस्थापित होऊ शकते.
धर्माची व्याख्या
“धर्म म्हणजे तो मार्ग जो आपल्याला संतुलित जीवनाकडे घेऊन जातो, विविधतेला स्वीकारतो आणि सर्वांच्या अस्तित्वाचा आदर करतो. हेच खरे विश्वधर्म आहे आणि हिंदू समाजाने संघटित होऊन तो जगासमोर मांडायला हवा.”
जगाची सद्यस्थिती आणि उपाय
वैश्विक पातळीवर ते म्हणाले की, “शांती, पर्यावरण आणि आर्थिक विषमता यावर चर्चा होत आहे, उपाय सुचवले जात आहेत, पण समाधान अजूनही दूर आहे.”
त्यासाठी त्याग, बलिदान आणि प्रामाणिक विचार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताने संयम दाखवला
सरसंघचालक म्हणाले की, “आपल्यावर नुकसान झाले तरी भारताने संयम राखला आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांनाही संकटात मदत केली आहे. अहंकारातून शत्रुत्व निर्माण होते, पण भारत अहंकारापलीकडे आहे.” “संघ जे बोलतो, ते समाज ऐकतो” – हे संघाच्या सेवा व समाजनिष्ठेमुळे मिळालेले आहे.

भविष्याची दिशा
संघाचे उद्दिष्ट आहे की, संघकार्य सर्व ठिकाणी, सर्व स्तरांवर पोहोचावे. समाजात चांगले कार्य करणारी सज्जनशक्ती एकत्र यावी. यासाठी संघाने सज्जन शक्तीशी संपर्क ठेवण्याचा संकल्प केला आहे. संघ समाजाच्या स्वभावात सकारात्मक परिवर्तन घडवू इच्छितो. ओपिनियन मेकर्सशी सतत संवाद ठेवून एक सकारात्मक विचारधारा रुजवायची आहे.
विविधतेतील एकता
भागवत म्हणाले की, “जे धार्मिक विचार भारतात बाहेरून आले, ते काही लोकांनी काही कारणांमुळे स्वीकारले. तेही आपलेच आहेत. पण परकीय विचारांमुळे जी दुरावे निर्माण झाले, ती दूर करण्याची गरज आहे.” आपल्याला इतरांच्या वेदनाही समजून घ्याव्या लागतील. एक देश, एक समाज, एक राष्ट्र म्हणून, समान पूर्वज आणि सांस्कृतिक वारसा असताना आपल्याला एकत्रच पुढे जायचं आहे.”
आर्थिक विकासाची दिशा
ते म्हणाले, “आपण अनेक लहान प्रयोग केले, पण आता राष्ट्रीय स्तरावर नवा आर्थिक प्रतिमान उभा करणे गरजेचे आहे. आत्मनिर्भरता, स्वदेशी आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा विकास मॉडेल उभा करावा लागेल.” शेजारी देशांबद्दल म्हणाले की, “नदी, डोंगर आणि माणसं तीच आहेत. फक्त नकाशावर रेघा काढलेल्या आहेत. आपल्या संस्कृतीचे मूळ एकच आहे. पंथ वेगळे असले तरी संस्कारांवर वाद नाही.”
‘पंच परिवर्तन’ – घरापासून सुरुवात
संघाने सांगितले की, परिवर्तनाची सुरुवात घरापासून करावी लागेल. त्यासाठी पंच परिवर्तन:
- कुटुंब प्रबोधन
- सामाजिक समरसता
- पर्यावरण संरक्षण
- स्व-ओळख (स्वदेशी)
- नागरिक कर्तव्यांचे पालन
त्यांनी उदाहरण दिले – सणांवेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करावी, स्वभाषेत स्वाक्षरी करावी, आणि स्थानिक उत्पादने सन्मानाने घ्यावीत.
कायदा पाळणे आणि संयम
“आपले पूर्वज हसत-हसत फाशीवर गेले. आज आपल्याला २४ तास देशासाठी जगायला हवे. कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.आपल्याला कायद्याचा आणि समाजाच्या हिताचा विचार करून प्रत्येक कृती करावी लागेल.” “संघ क्रेडिट बुकमध्ये येवू इच्छित नाही. संघाला हवे आहे की भारत अशी झेप घेईल की त्याचे परिवर्तन तर होईलच, पण संपूर्ण जगात सुख आणि शांती प्रस्थापित होईल.”
